महाराष्ट्राचे राष्ट्रीयत्व म्हणजे काय? मुळात महाराष्ट्राला स्वतःचे स्वतंत्र राष्ट्रीयत्व आहे का? याचा स्पष्टसा खुलासा आजही महाराष्ट्राच्या समाजमनात झालेला दिसत नाही. दि. के. बेडेकर यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ (१९४७) या आपल्या पुस्तकात मात्र महाराष्ट्राच्या राष्ट्रीयत्वाचे वस्तुनिष्ठ स्वरूप मांडले आहे. यानुषंगाने युरोपीय राष्ट्रवादाचा उदय लक्षात घेताना ते म्हणतात,
‘आधुनिक भांडवलदारीच्या पूर्वतयारीच्या काळातल्या आर्थिक घडामोडींमध्ये इंग्लंड, फ्रान्स इत्यादी राष्ट्रांचे अधिष्ठान आपल्याला सापडते’
थोडक्यात राष्ट्रीयत्व हे मुळात भावनांशी नव्हे, तर अर्थकारणाशी निगडित असल्याचे ते सुचवतात.
महाराष्ट्राचे आधुनिक राष्ट्रीयत्व
महाराष्ट्राच्या राष्ट्रीयत्वाविषयी बोलताना ते म्हणतात,
‘आजच्या अर्थाने राष्ट्रीय नसलेली, परंतु मध्ययुगीन समाजात जो एकजिनसीपणा भाषेमुळे व इतर समान बंधनांनी येतो त्यामुळे उद्भवलेली एक महाराष्ट्रीयत्वाची जाणीव बाराव्या शतकापासून अस्तित्वात असावी असे दिसते’
याच संदर्भात पुढील प्रकरणात विश्लेषण करत असताना ते म्हणतात,
‘विसाव्या शतकात नवे आर्थिक व्यवहार महाराष्ट्रातील समाजात स्वतंत्रपणाची भावना वाढविण्यास कारणीभूत होत आहेत’
अर्थात महाराष्ट्रात पूर्वीपासूनच एकप्रकारचा एकजिनसीपणा असला, तरी भांडवलदारीच्या काळात वृद्धिंगत झालेल्या आर्थिक व्यवहारांमुळे महाराष्ट्रात आधुनिक राष्ट्रीयत्व रुजू लागले असे त्यांचे म्हणणे असल्याचे दिसते.
भारतीय संघराज्यात सामील होण्याचा आधार
भारतात जे निरनिराळे प्रांत मानले जातात, ते प्रत्यक्षात राष्ट्र आहेत. ही वस्तुस्थिती एकदा लक्षात घेतल्यानंतर मग या राष्ट्रांनी भारतीय म्हणून संघराज्यात का सामील व्हावे? असा प्रश्न निर्माण होतो. एकत्र येण्यामागे काही लोक धर्माचे, तर काहीजण संस्कृतीचे कारण पुढे करतात. परंतु बेडेकर यांनी संघराज्यात एक होण्याचा आधार कोणता? हे वैचारिकतेने अधोरेखित केले आहे. आपले मत मांडताना ते म्हणतात,
‘संघराज्याचा आधार कोणचा हे अगदी उघड आहे. आपल्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, संरक्षणात्मक वगैरे अनेकविध आधुनिक गरजांसाठी आपापले स्वतंत्र सामर्थ्य एकवटण्याची महाराष्ट्रादी राष्ट्रांची इच्छा एवढा एकच परंतु पुरेसा आधार हिंदी संघराज्याला आहे’
महाराष्ट्राच्या राष्ट्रीयत्वामागे इतिहास नव्हे, तर भांडवलदारी अर्थव्यवस्था
बेडेकर यांनी पुस्तक लिहिले त्यावेळी दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. त्यामुळे महाराष्ट्रीय राष्ट्रीयत्वात युरोपियन देशांप्रमाणे दुराभिमानाचा संचार होण्याचा धोका लक्षात घेऊन ते म्हणतात,
‘महाराष्ट्र हे प्राचीन इतिहासाने सिद्ध होणारे राष्ट्र नसून अर्वाचीन काळात भांडवलदारी अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबर उदयास येत चाललेले राष्ट्र आहे, हे तत्त्व मानल्यास ऐतिहासिक व सांस्कृतिक कारणे दाखवून महाराष्ट्राची व्याप्ती वाढविण्याचा मोह कोणास होणार नाही’
भारतीय संघराज्यातील महाराष्ट्र या राष्ट्रातील प्रांतांना स्वायत्तता
‘संयुक्त महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दि. के. बेडेकर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणतात की,
‘महाराष्ट्र हे एकात्मराष्ट्र मानले पाहिजे असे मांडत असतांनाच संयुक्त भारतीय राज्याचा मी स्पष्ट पुरस्कार केलेला आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे. तसेच एकात्म अशा या महाराष्ट्र राष्ट्रांतील नागपूर, वर्हाड, कोकण, मुंबई इत्यादी विभागांना (उपप्रांतांना) स्वायत्तता देण्याचे तत्वही मी मानले आहे हे विसरू नये’
थोडक्यात भारताला एक संघराज्य मानत असताना महाराष्ट्र हे एक राष्ट्र असल्याचे लक्षात घ्यावे आणि या राष्ट्रातील उपप्रांतांना स्वायत्तता मिळावी अशी बेडेकर यांची सुस्पष्ट भूमिका होती. यातच त्यांची वैचारिक सखोलता व दूरदृष्टी दिसून येते.
स्वातंत्र्याच्या सुमारास जनभावनेचा जो महासागर उसळला, त्यात कोणी धर्माच्या नावाने, तर कोणी संस्कृतीच्या आधाराने, तर कोणी भांडवलदारांच्या प्रभावाने राष्ट्रीयत्वाचा आपापला अर्थ लावू पहात होते. अशावेळी दि. के. बेडेकर यांच्यासारख्या कलावंताचे वस्तुनिष्ठ विचार धर्मवादी, समाजवादी विचारांच्या भावनिक धुक्यामध्ये कुठेतरी हरवून गेले असे दिसते. असे असले तरी त्याकाळी देखील कोणीतरी महाराष्ट्राच्या अस्तित्वाविषयी सखोल विचार करत होते ही बाब मात्र निश्चितच दिलासादायक आहे.
लेखन : ४ जानेवारी २०२१, रविवार
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
Discover more from Rohan J
Subscribe to get the latest posts sent to your email.