‘मौनाचा नादस्वर’ ही कौशलदादांची (संगीतकार कौशल इनामदार) युट्यूबवरील मुलाखत पाहण्यात आली. त्यात एका दूर्लक्षित म्हणण्यापेक्षा गृहित धरल्या गेलेल्या ‘मौन’ या विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे. एखादा विषय आणि त्यातील मुद्दे आपण लक्षपूर्वक ऐकतो आणि मग त्यावर चिंतन घडून जसे आकळते तसे आपसुक त्यास आपल्या स्वतःच्या विचारांची जोड मिळते व त्याची आपल्या आत एक सांगड घातली जाते. अशी सांगड कालांतराने शब्दातीत होते व केवळ तिचे अस्पष्ट ठसे आपल्या अंर्तमनात उरतात. त्यामुळे त्यास शब्दबद्धता देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर ज्या १० मुद्द्यांमधून या मुलखतीच्या निमित्ताने माझ्या मनात मौनाच्या संदर्भाने एक चिंतनात्मक सांगड घातली गेली ते पुढीलप्रमाणे आहेत.
जेंव्हा एखादा संवाद सुरू असतो, तेंव्हा हा संवाद ज्या परिसरात सुरू असतो, त्या परिसरातील आवाजांचा देखील एक आगंतुक संवाद सुरू असतो. आपल्या संवादातील मौनाच्या जागा परिसरातील हा आगंतुक संवाद नकळत भरून काढतो आणि आपल्या संवादाच्या चवीला तो आपला स्वतःचा असा एक स्वाद देतो.
संवाद ज्या नादाने मौनाशी येऊन अल्प‘विराम’ घेतो, त्यावरून त्या मौनाचा चिंतनशील अंर्तमनाशी गुणात्मक अर्थ लागतो.
जिवनचक्रात निरव मौन असे काही नसून मौन हे केवळ दोन आवाजांच्या सापेक्षतेत आहे. यालाच जोड देत वाटते की, जिवनचक्रात जे अनुभवास येते, त्यातील मौन हे सापेक्षतेत आहे, परंतु ज्याच्याकडून अनुभवले जात आहे त्याचे मौन मात्र उगमाचे अर्थात शब्दातीत आहे.
मौनाचे खरे मूल्य हे ऐकण्याच्या गुणवत्तेत आहे. ऐकण्यातील एकाग्रता व गांभीर्य हे मौनाला, पर्यायाने संवादाला, संवादकर्त्याला समृद्ध करते.
आवाजाचा जो नाद आहे, त्या नादामध्ये माणसाच्या अंर्तमनात मौनाची जागा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे.
मौनामध्ये कोलाहलाची सांगड घातली जाते. त्यामुळे सृजनशीलतेला शांततेची ओढ असते.
आपल्या अंतर्मनात जो सातत्यपूर्ण आवाज असतो त्याला मौनाचा स्पर्श देऊन एक अंतर्नाद निर्माण करण्याची ताकद स्वरांच्या रचनेत असते.
निश्चल तलावाप्रमाणे असेही एक तरल मौन असते ज्यात सुरेल आवाजाचा खडाही मौनाची तरलता भंग करून त्यात तरंग निर्माण करतो, त्यामुळे अशा तरल मौनात अगदी सुरेलताही नकोशी होते.
मौनभंगता हा माणसाचा नैसर्गिक स्थायीभाव असला, तरी त्यामागील त्याची सृजनशीलता ही त्या माणसाच्या व्यक्तित्त्वाची गुणवत्ता ठरवते.
दृश्यात जे दिसते त्यापलीकडे दृश्याचे आपले एक मौन असते जे संगीतातून व्यक्त होते.
अर्थात कौशलदादा हे स्वतः संगीतकार असल्याने संगीताच्या अंगानेच या मुलाखतीत प्राधान्याने चर्चा झालेली आहे, पण मी इथे ती शक्यतो संवादाच्या अंगाने घेतली आहे. याव्यतिरीक्त लिखित व मौखिक परंपरेविषयी देखील कौशलदादांनी आपले मत त्यात मांडलेले आहे. तर ‘मौन’ या विषयावर आपल्या स्वतःच्या चिंतनाला चालना मिळायची असेल, तर त्यांची संपूर्ण मुलाखत पुढील धाग्यावर पाहता येईल – https://lahan.link/maunacha-naadswar.
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
