मराठीत बोलून पावे मराठी
मनातून वाहून विश्वात ती
उभी राहता हीच जीवंत पाठी
नसे भ्रांत जन्मास या कोणती
महा होय राष्ट्र कसूनी मराठी
फुलावीत शब्दे जगी जागती
पुढे चालता हीच आधार काठी
भटक्या मनाला दिशा दावती
जगण्यास लाभेल मत्ता मराठी
कमाई घडे साथ येऊन ती
कुटूंबास पोसून राहून गाठी
समाजास संपन्न देऊन ती
असण्यास मिळून सत्ता मराठी
स्वराज्यात मानात थाटून ती
घुमूनी तिचा नाद दिशांत आठी
स्वतःशीच विश्वास बाणून ती
पावे मराठी : भावार्थ
मराठीत बोलून पावे मराठी
मनातून वाहून विश्वात ती
उभी राहता हीच जीवंत पाठी
नसे भ्रांत जन्मास या कोणती
भावार्थ : देवाची आराधना केल्यानंतर देव जसा पावतो, प्रसन्न होतो, तशी मराठी भाषा पावण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी केवळ मराठी भाषेत बोलणे एव्हढेच पुरेसे आहे. विश्वाचे प्रतिबिंब हे सरतेशेवटी आपल्या मनात आणि तेही मराठी भाषेत उमटलेले आहे. पर्यायाने विश्वाचेच एक प्रतिरुप होऊन मराठी भाषा ही आपल्या मनातून सार्या विश्वात वहात आहे. देव जसा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तशी साक्षात मराठी भाषाच जेंव्हा आपल्या पाठीशी जिवंतपणे उभी राहते, तेंव्हा या जन्मास, जीवनास कसलीही भ्रांत, चिंता, विवंचना उरत नाही.
महा होय राष्ट्र कसूनी मराठी
फुलावीत शब्दे जगी जागती
पुढे चालता हीच आधार काठी
भटक्या मनाला दिशा दावती
भावार्थ : शेतकरी जसा प्रेमाने, कष्टाने जमीन कसून शेती फुलवतो, मोठी करतो, तसे मराठी भाषा कसल्याने, तिच्यात कला, साहित्यनिर्मिती केल्याने हा आपला ‘महाराष्ट्र’ एक ‘महान राष्ट्र’ होईल. मराठी भाषेतील शब्द, विचार हे सबंध जगात जागेपणाने, जिवंतपणाने, द्रष्टेपणाने फुलून येतील, मुक्त होतील. अशाप्रकारे आयुष्यात पुढे झेप घेत असताना, मार्गस्थ असताना जेंव्हा कधी एखादा कठीण प्रसंग येईल, तेंव्हा त्या हळव्या क्षणी मराठी भाषेतील विचार, ओळी या एखाद्या काठीप्रमाणे आपल्याला तसेच पुढे चालत राहण्याकरीता आधार देतील, आणि जे आपले भटकणारे, भरकटलेले मन आहे त्यास ती निश्चित अशी दिशा दाखवेल, वैचारिक अधिष्ठान देईल.
जगण्यास लाभेल मत्ता मराठी
कमाई घडे साथ येऊन ती
कुटूंबास पोसून राहून गाठी
समाजास संपन्न देऊन ती
भावार्थ : आपल्या जगण्यास जी काही धन-संपत्ती, मत्ता लागणार आहे, ती आपणास लाभायची असेल, तर त्याकरीता मराठी भाषेचे वैभव पुरेसे आहे. मराठी भाषेला सोबत घेतल्याने, या भाषेत व्यवहार केल्याने आपल्या आयुष्यात आयुष्याची कमाई होईल. आपणास एव्हढे भरभरून मिळेल की, आपल्या कुटूंबास पोसून, कुटूंबाचा उदरनिर्वाह सांभाळून, आपल्या सर्व गरजा नि स्वप्ने पूर्ण करुन त्याऊपर विपुल अशी धनसंपत्ती, ज्ञानसंपत्ती ही आपल्या जवळ, आपल्या गाठीशी उरेल, आणि स्वतःसह मराठी भाषा देखील भरुन पावेल. पर्यायाने मराठी भाषेची, भाषेने दिलेली ही संपन्नता ओघळून समस्त समाजास लाभेल आणि यात सर्वांचाच उत्कर्ष होईल.
असण्यास मिळून सत्ता मराठी
स्वराज्यात मानात थाटून ती
घुमूनी तिचा नाद दिशांत आठी
स्वतःशीच विश्वास बाणून ती
भावार्थ : मानवी अस्तित्त्व हे या विश्वात आपल्या सत्तेने अस्तित्त्वात आहे, आणि मराठी भाषा ही आपल्यासाठी या सत्तेचे चलन आहे, साधन आहे. तिने आपल्या मनात, स्वराज्यात, स्वतःच्या राज्यात मानाने, आत्मसन्मानाने आपले अधिराज्य थाटले आहे. तिच्या सर्वभौमत्त्वाचा नाद पृथ्वीतलाच्या आठही दिशांमध्ये घुमत असून ती आपल्यात एक अजिंक्य असा दैवी विश्वास बाळगून आहे.
कवी : रोहन जगताप
लेखन : मार्च २०२४ । वृत्त : सुमंदारमाला
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
Discover more from Rohan J
Subscribe to get the latest posts sent to your email.