‘भाषा हे केवळ संवादाचे माध्यम आहे’ असे म्हटले जाते. पण ते खरेच केवळ संवादाचे माध्यम आहे का? की संवादापलीकडे भाषेचे आपले काही महत्त्व आहे? मुळात भाषेचा वापर कशासाठी केला जातो? तर भाषेचा वापर आपापसांतील व्यवहारांसाठी केला जातो. त्यामुळे भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून मुळात ते व्यवहाराचे माध्यम आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. आपण दुकानात जातो, तेंव्हा ‘भाषा’ वापरुन आपल्याला काय हवे? ते सांगतो, आणि सोबत ‘चलन’ वापरुन आपल्याला हवे ते घेऊन येतो. थोडक्यात ‘भाषा’ आणि ‘चलन’ वापरुन कोणताही व्यवहार पूर्ण होतो. आणि शेवटी प्रत्येक व्यवहाराच्या मुळाशी अर्थकारण असले, तरी बाह्यांगाने मानवी व्यवहार हे केवळ आर्थिक नसतात, तर ते भावनिक, सामाजिक, मानसिक, बौद्धिक असे निरनिराळ्या प्रकारचे असतात. थोडक्यात सर्व प्रकारचे मानवी व्यवहार हे भाषेच्या माध्यमातून चालतात. त्यामुळे भाषा हे देखील व्यवहारासाठी वापरले जाणारे एकप्रकारचे चलनच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परिणामी चलनाचे सारे गुणात्मक निकष हे भाषेलाही लागू पडतात.
समजा आपण असे म्हटले की व्यवहार हा शेवटी व्यवहार आहे, मग तो रुपयात झाला, डॉलरमध्ये झाला किंवा येनमध्ये झाला, काय फरक पडतो? स्विकृतदर्शनी तार्किकदृष्ट्या हे अगदी योग्य वाटते, पण मग डॉलर हे जगातील सर्वांत मजबूत चलन आहे म्हणून आपण आपल्या देशांतर्गत व्यवहारांसाठी डॉलरचा स्वीकार का करत नाही? याउलट रुपयाचा जागतिक स्तरावरील वापर वाढावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो. कारण आपले चलन हे आपली सामाजिक परिस्थिती आणि त्यानुषंगाने आपले सामाजिक हित लक्षात घेऊन तयार झाले आहे, आणि परकीय चलनाच्या केंद्रस्थानी परकीय समाजाचे हित आहे. ज्यात काही वावगे नाही, पण ते आपल्याला पुरक नाही इतकेच! मग हाच निकष भाषेलाही लागू पडत नाही का? महाराष्ट्राच्या भौगोलिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला अनुषंगुन मराठी भाषेची जडणघडण झालेली आहे. परभाषेची जडणघडण होताना त्या प्रदेशातील सामाजाचे हित तिच्या केंद्रस्थानी राहिलेले आहे. ज्यात काही वावगे नाही, पण ते आपल्यासाठी पुरक नाही इतकेच!
रुपयाचे जर अवमुल्यन झाले, तर रुपयामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांना त्याची झळ बसणार नाही का? अलीकडेच शेजारील श्रीलंकेचे उदाहरण आपण पाहिलेले आहे. अशाचप्रकरे जर मराठीचे अवमुल्यन झाले, तर त्याची झळ ज्यांनी या भाषेत जन्मतःच गुंतवणूक केलेली आहे त्यांना बसणार नाही का? मराठीच्या मुद्द्याच्या अनुषंगाने मराठी समाजात जी उद्विग्नता दिसून येते त्याचे मूळ हे असे यात दडलेले आहे. मराठीचे अवमुल्यन झाल्याने महाराष्ट्राला जी झळ बसते आहे ती खरी आहे. पण ही झळ केवळ अर्थकारणापुरती मर्यादीत नसून भावनिक, सामाजिक, मानसिक, राजकीय अशा महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या मानवी व्यवहारांवर याचा परिणाम झालेला आहे. सर्वच मराठी माणसांना या अवमुल्यनाची झळ बसते आहे आणि निसर्गनियमाने ती बसणारच! पण अनाकलनामुळे, भावनांमध्ये वहावत गेल्याने किंवा आत्तापुरते, स्वतःपुरते पाहिल्याने अनेकांचे त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष झालेले आहे.
शिवाजी महाराज जगाचा व्यवहार आणि त्यानुषंगाने चलनाचे महत्त्व जाणत होते. त्यामुळे राज्याभिषेकावेळी आपले चलन चालवण्याची मागणी घेऊन आलेल्या इंग्रजांना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. उलट ‘होन’ हे आपले स्वतःचे चलन सुरु केले आणि मराठीला आपली राज्यकारभाराची भाषा करुन मराठीला चलनात आणले. फारसी राज्यकर्त्यांनी फारसी, मराठा राज्यकर्त्यांनी मराठी आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी इंग्लिश भाषेचा राज्यकारभारासाठी वापर केला. सामाजाची भाषा आणि राज्यकारभाराची भाषा एक असणे हे स्वतंत्र समाजाचे सर्वांत मोठे लक्षण आहे. आज मराठी समाजाचा राज्यकारभार पूर्णपणे मराठी भाषेत चालतो का? आपण समजतो तसे खरेच पूर्णतः स्वतंत्र आहोत का? की तो आपला ग्रह आहे? याचे अगदी प्रामाणिक व तार्किक चिंतन मराठी मनाने स्वतःशी करायचे आहे.
आज डॉलरला जगात मागणी आहे कारण त्यामागे तशी गुणात्मक विश्वासार्हता आहे, ज्याचा अमेरीकेला पुष्कळ आर्थिक फायदा होतो. त्याचप्रमाणे इंग्लिश भाषेतील ज्ञानामुळे या भाषेला जागतिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. पण असे महत्त्व प्राप्त होणे ही केवळ अभिमानाची बाब नसून त्याचा प्रचंड आर्थिक नफा हा इंग्लिश जगताला झालेला आहे. कारण प्रत्येक भाषेचा आपला असा एक अव्यक्त विनिमय दर असतो. त्यावरुनच त्या भाषेची किंमत लागते. हे दर अव्यक्त असल्याने आपल्याला दिसत नाहीत, पण निश्चितपणे जाणवतात. आपल्याला आपल्या भाषेची मागणी वाढवायची असेल, तिचे चलन बळकट करायचे असेल आणि त्यानुषंगाने समाजाचा आर्थिक उत्कर्ष घडवायचा असेल, तर आपण आपल्या भाषेतील ज्ञान वाढवायला हवे, तिचा वापर वाढवायला हवा. आजची नवी पिढी ही गुणवान आहेच, पण हे गुण आपल्या भाषेत व्यक्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी करायला हवा. आपली गुणवत्ता वाढवणे आणि आपल्या भाषेत व्यक्त होणे यातूनच मराठी समाजाचा खरा उत्कर्ष साधला जाणार आहे.
रुपया न वापरता डॉलर वापरल्याने आपला आर्थिक उत्कर्ष होणार नाही का? निश्चितपणे होईल! अमेरिकेत जी मराठी माणसे स्थायिक झाली आहेत, ते तिथे डॉलरच वापरत आहेत आणि त्यांचे अगदी व्यवस्थित चालले आहे. पण त्याचा आपल्याला काही उपयोग होतो आहे का? सुरुवातीला तिकडून काही प्रमाणात आपल्याकडे पैसे पाठवले जातात, पण पुढे संपत्तीचा बहुतांश भाग हा अमेरिकेतच उपयोगाला येतो, अनेकजण तर कायमस्वरुपी तिकडेच स्थायिक होतात. त्याचप्रमाणे मराठी न वापरता इंग्लिश वापरल्याने आपला आर्थिक उत्कर्ष होणार नाही का? तर निश्चितपणे होईल, पण तो बहुतकरुन केवळ आपल्यापुरताच मर्यादित राहील. त्याचा आपल्या समाजाला तितकासा उपयोग होणार नाही. शिवाय भाषेचे व्यवहार हे निव्वळ अर्थकारणापुरते मर्यादीत नसतात. त्यामुळे रोजच्या व्यवहारातून आपले भाषिक ‘चलन’ कसे बळकट होईल? याचा आपण सर्वांनीच विचार करायला हवा.
लेखक : रोहन जगताप
दिनांक : २५ फेब्रुवारी २०२४ : गुरुप्रतिपदा
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
Discover more from Rohan J
Subscribe to get the latest posts sent to your email.
