भिती वाटता जीव काहूर राही
न जाणे कसे काय होणार काही
विचारात गुंतून डोके सदाही
उरी दाटता भाव आभास पाही
खरे काय ते की मनाचाच कावा
कुणी ओळखावे कसे सांग देवा
जिवाचा मुठीतून आकांत धावा
धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भिताना मनाची मनालाच याही
हताश क्षणाची असे होत लाही
रडूनी नसे साध्य इच्छाच काही
मनी आसवांना जगी अंत नाही
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत
अडोसाच नाही उभा वादळात
निमूट स्वतः पाहिले मी मनात
दिसूनी मला मी नसूनी तयात
नसूनी तयात : भावार्थ
भिती वाटता जीव काहूर राही
न जाणे कसे काय होणार काही
विचारात गुंतून डोके सदाही
उरी दाटता भाव आभास पाही
भावार्थ : जेंव्हा कधी मनास भिती वाटते, तेंव्हा जिवात जसे काहूर माजते, कालवाकालव होते. काय होईल नि काय नाही? असे राहून राहून वाटू लागते. आपले डोकेही सतत विचारात गुंतून कसलासा तोच तो विचार करत राहते. अशावेळी आपल्या उरात, अंतरंगात भितीच्या अनुषंगाने निरनिराळे नकोसे भाव दाटून येतात आणि पर्यायाने आपले डोके नकोनकोते आभास पाहू लागते, त्यास ते आभास दिसू लागतात.
खरे काय ते की मनाचाच कावा
कुणी ओळखावे कसे सांग देवा
जिवाचा मुठीतून आकांत धावा
धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भावार्थ : अशावेळी काय खरे नि काय खोटे? ते कळेनासे होते. आपल्याला वाटत असलेली भिती तथ्यावर आधारित आहे की तो मनानेच आपल्या कल्पनेने उभा केलेला बागुलबुवा आहे!? मनाचा हा ‘कावा’ कसा आणि कोण ओळखणार? देव तरी हे सांगू शकेल काय? अशावेळी देवाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. भितीच्या या मानसिक यातनेत धगधगणार्या आपल्या मनाला शांत ठेवावे तरी कसे? हा एकच धावा, सततचा विचार, देवाची दयायाचना आपण जीव मुठीत घेऊन जिवाच्या आकांताने, प्राणपणाने करु लागतो.
भिताना मनाची मनालाच याही
हताश क्षणाची असे होत लाही
रडूनी नसे साध्य इच्छाच काही
मनी आसवांना जगी अंत नाही
भावार्थ : पुढे पुढे ही भिती इतकी वाढू लागते की आपल्याला अगदी आपल्या मनाचीही भिती वाटू लागते. अशावेळी आयुष्यातील क्षण अगदी हताश होऊन जातात, त्यांना काहीच सुचेनासे होते. कल्पना आणि मनाच्या दुहेरी ज्वालेत त्यांची लाहीलाही होऊ लागते. असे असले तरी आपली जी काही इच्छा आहे ती असे हताश होऊन, रडून साध्य होणार नसते. कारण या जगात दुःखाला, भितीला आणि त्यातून निखळणार्या आसवांना, अश्रूंना कोणताही अंत नाही, कोणतीही किंमत नाही.
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत
अडोसाच नाही उभा वादळात
निमूट स्वतः पाहिले मी मनात
दिसूनी मला मी नसूनी तयात
भावार्थ : आपल्या आत काय चालू आहे? याच्याशी बाहेरील जग अनभिज्ञ असते, अलिप्त असते. बाहेर सारेकाही स्वर्गाप्रमाणे सुखनैव दिसत असले, तरी आतून मात्र आपण पाताळ यातना भोगत असतो. मनाच्या या वादळात अडोसा तरी कुठे घेणार? वादळानेच वादळात अडकावे अशी आपली गत होते. कोणताच मार्ग, कोणतीच आशा उरत नाही, अशावेळी सारे प्रयत्न सोडून ‘मी’ निमूटपणे केवळ स्वतःकडे पहात राहतो, आणि त्याला स्वतःचाच साक्षात्कार घडतो. त्याच्या लक्षात येते की आपण प्रत्यक्षात मनाच्या या वादळात कधी अडकलोच नव्हतो.
कवी : रोहन जगताप
लेखन : मार्च २०२४ । वृत्त : भुजंगप्रयात
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
Discover more from Rohan J
Subscribe to get the latest posts sent to your email.