कठीण समय येता ‘महाराष्ट्र धर्म’ कामास येतो

आजकाल ’महाराष्ट्र धर्म’ हा शब्दप्रयोग कधी नव्हे इतका वारंवार कानावर पडतो आहे आणि सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना महाराष्ट्र धर्माची साद घातली जात आहे. त्यात कॉग्रेस विचारसरणीच्या नेत्यांच्या, पत्रकारांच्या तोंडून ‘महाराष्ट्र धर्म’ ऐकणे हे तितकेसे सवयीचे नसल्याने त्याचे विशेष अप्रुप आहे. जसे एखाद्या खाष्ट माणसाने अचानक आपला सूर बदलून आपल्याशी प्रेमळ बोलावे, तेंव्हा त्यावर कितपत विश्वास ठेवावा अशी शंका यावी, तसे हे काहीसे आहे. कारण मराठीच्या अनुषंगाने ‘संकुचित’, ‘डबक्यातील बेडूक’ याच संकल्पना काँग्रेसने आजवर हिरिरीने बिंबवल्या आहेत.

त्यावरही कहर म्हणजे ज्यांच्यामुळे मुळात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना सरतेशेवटी आपली आई आठवावी तसा ‘महाराष्ट्र धर्म’ आठवला, त्या भाजपने देखील परवा ‘महाराष्ट्र धर्म’ हा शब्दप्रयोग उगाच आपला वापरुन पाहिला. पण इथे मात्र त्यांना एका गोष्टीचे श्रेय हे निश्चितपणे द्यायला हवे. वाईट काळात माणूस जेंव्हा अधिक आत्मपरिक्षण करतो आणि माणसाला स्वतःचाच नव्याने शोध लागतो, तेंव्हा त्याचे श्रेय हे जसे वाईट काळालाही दिले जाते, तसे आज सर्वच राजकीय पक्षांना, पत्रकारांना आत्मपरिक्षणानंतर ‘महाराष्ट्र धर्म’ आठवतो आहे, त्याचे श्रेय हे भाजपला द्यायलाच हवे.

महाराष्ट्र धर्म
महाराष्ट्र धर्म

शिवसेना, राष्ट्रवादीसह इतर सर्व राजकीय पक्षांनी जेंव्हा महाराष्ट्र धर्माला गृहित धरले होते, तेंव्हा महाराष्ट्र धर्माची जनमानसाला साद घालणारा मनसे हा ऐकमेव राजकीय पक्ष होता हे देखील इथे मान्य करायला हवे. पण मनसे हा कायमच एखाद्या होतकरु मुलासारखा राहिला आहे, ज्याच्यात गुणवत्ता तर आहे, पण त्या गुणवत्तेला मूर्तरुप देण्याचे व्यवहारज्ञान नाही. शिवाय आजकाल बदलत्या राजकीय समिकरणांनुसार राजकीय पक्ष आपापली विचारसरणी कशी बदलत राहतात हे पाहणे देखील रोचक झालेले आहे

अखेर ‘महाराष्ट्र धर्म’ हा आपल्या आई सारखाच आहे. चांगली वेळ असताना एरवी आई आपणाला आठवत नाही, तिला आपण गृहित धरतो, तिला मनात येईल ते बोलतो, पण आपल्याला जर काही झाले, तर मात्र सगळ्यात आधी आईच आठवते! दुसरीकडे आईलाच जर काही झाले, तर तेही आपल्याला सहन होत नाही. अगदी याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना आज सांभाळून घेण्यासाठी महाराष्ट्र धर्माचा पदर लागतो आहे, दुसरीकडे महाराष्ट्र धर्माची होत असलेली अवहेलनाही कदाचित त्यांना सहन होत नसावी असे आपण मानायला हरकत नाही. असे असेल तर हेच त्यांच्यातील जिवंतपणाचे लक्षण समजावे.

आई ही शेवटी आई असते, मुलाच्या सार्‍या चुका ती आनंदाने पदरात घेते. काही झाले तरी ती आपल्या मुलातील चांगुलपणावर विश्चास टाकत राहते. कठीण समय येता ‘महाराष्ट्र धर्म’ कामास येतो. महाराष्ट्र धर्माने मागील हजार वर्षांत याहूनही कठीण आव्हानांचा सामना केला आहे, यावेळी देखील तो समस्त महाराष्ट्रास, मराठी मुलखास सांभाळून घेईल याची खात्री आहे.


Discover more from Rohan J

Subscribe to get the latest posts sent to your email.