रोमन साम्राज्याच्या अस्तानंतरचा काळ हा ‘अंधःकार युग’ म्हणून ओळखला जातो. साधारणतः इसवी सन ५०० ते इसवी सन १००० या कालखंडात मानवी प्रगतीला खिळ बसली. अरब जगत मात्र यास अपवाद होते. त्यानंतर १२ व्या शतकाच्या सुरुवातीला इटलीमध्ये परिवर्तनाची एक नवी लाट आली. अगदी त्याचवेळी महाराष्ट्रातही वैचारिक दृष्टीकोनातून चिरंतर तत्त्वज्ञानाची मांडणी होऊ लागली होती. वैश्विक चैतन्याने जोडलेल्या या जगात सर्वत्र नव्या विचारांची पालवी फुटत होती!

त्याकाळी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव राज्य करत होते. ११व्या व १२व्या शतकात चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची कास धरली. सर्वसामान्य लोकांपर्यंत आपले ज्ञान पोहचावे यासाठी त्यांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला. त्यानंतर १२९०च्या सुमारास ज्ञानेश्वारांनी ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान मराठी भाषेत आणले. ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक समकालीन संतांनी त्यावेळी समाजप्रबोधनाचे कार्य केले. विशेष म्हणजे याकाळातच पुढे यादव साम्राज्याचा अस्त झाला व महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला.

त्यावेळी इटलीमध्ये ग्रीक तत्त्वज्ञानाच्या आधाराने नाविण्यपूर्ण विचार रुजण्यास सुरुवात झाली होती. इटली, ग्रीस हे देश युरोपच्या प्रवेशद्वारावर आहेत. चीन पासून युरोप अंतर्गत रेशिम मार्गाने जो व्यापार चालायचा तो प्रामुख्याने याच भागातून होत असे. त्यामुळे इटलीतील शहरांना व्यापारी केंद्रांचे स्वरुप प्राप्त झाले. व्यापार वाढल्याने इटलीतील व्यापारी श्रीमंत होऊ लागले; तसे त्यांनी आपापल्या शहरांची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. याचदरम्यान १३५०च्या सुमारास युरोपला ‘ब्लॅक डेथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामारीने घेरले. परिणामी युरोपची लोकसंख्या कमालीची घसरली. अशाने शेती तसेच व्यवसायात कामगारांची कमतरता निर्माण झाली. कामगारांची मागणी वाढल्याने समाजातील भेदभावाचे बंध आपसुकच ढिले झाले, शिवाय लोकांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारली. त्याकाळी अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने कदाचित माणसास जीवनाचीही किंमत उमगली असावी. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याने प्राचीन तत्त्वज्ञानाने बहुदा पुनःश्च नव्याने जन्म घेतला. येथूनच खर्‍या अर्थाने ‘रिनेसॉन्स’ म्हणजेच ‘पुनरुत्थान’ होण्यास प्रारंभ झाला असे म्हणता येईल.

पुरातन काळी ग्रीस तसेच रोमने बहुआयामी क्षेत्रांत मोठी उंची गाठलेली दिसते. परंतु अंधार्‍या युगात त्यांच्या दैदिप्यमान प्रगतीची वाढ जणू खुंटली होती. पुढे इटलीला जेंव्हा आर्थिक व राजकीय स्थैर्य प्राप्त झाले, तेंव्हा तेथील लोकांस दैनंदिन रगाड्यातून थोडीशी सवड मिळाली. अशावेळी आपल्या महान पूर्वजांनी मागे सोडलेला वारसा निरखून पाहण्यात ते हरखून गेले. माणसाकडे जेंव्हा पुरेसा पैसा येतो, तेंव्हा तो चौकस वृत्तीने जीवनाचा अर्थ लावू पाहतो. कदाचित जीवनाप्रती असलेल्या याच कुतूहलातून इटलीमधील श्रीमंत व्यापार्‍यांनी पुढील काळात कला आणि कलावंत यांना आश्रय दिला.

याच कालखंडात ‘ह्युमनिझम’ विचारसरणी मूळ धरु लागली. मानवास मध्ययुगातून आधुनिक युगाकडे घेऊन जाणारे एक भव्य प्रवेशद्वार म्हणून या विचारसरणीकडे पाहता येईल. अशाने जीवनाकडे उदार, वैचारिक, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याची नवी दृष्टी मानवास प्राप्त झाली.

१५व्या व १६व्या शतकात ‘पुनरूत्थान’ आपल्या शिखरावर पोहचले. अशावेळी इटलीमधील फ्लोरेन्स शहर परिवर्तनाचे केंद्रबिंदू ठरले. त्या काळात निर्माण झालेल्या अप्रतिम कलाकृतींकडे दैवी प्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कार म्हणून पाहता येईल. लिओनार्डो द विंसी हे त्या काळातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. विज्ञान व कला अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांचा वावर होता. त्यांनी चितारलेले ‘दी मोना लिसा’ हे चित्र जगप्रसिद्ध आहे. लिओनार्डो द विंसी यांच्या कार्यकाळातच मायकलअँजेलो हे देखील एक थोर कलावंत म्हणून नावारुपास आले. ते केवळ एक महान चित्रकारच नव्हते, तर श्रेष्ठ मूर्तीकार देखील होते! मायकलअँजेलो यांनी कलेच्या क्षेत्रात आपला कायमस्वरुपी ठसा उमटवला. त्यांस समकालिन अशा राफेल यांनी देखील त्यावेळी चित्रकलेच्या माध्यमातून आपली देवदत्त प्रतिभा सिद्ध केली. पुनरूत्थान कालखंडात मानव कलेच्या क्षेत्रात नवी उंची गाठू लागला होता, परंतु त्याचवेळी त्याने उर्वरित क्षेत्रांतही क्षितिजाची परीक्षा घेण्यास सुरुवात केली होती.

कोपर्निकस हे त्याच काळातील व त्याच परिसरातील एक गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते ‘ह्युमनिस्ट’ या सुधारणावादी चळवळीचे समर्थक होते. त्यांनी आपली दूरदर्शिका वापरुन अवकाशाचे निरिक्षण केले. त्याधारे त्यांनी सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे आपले निरिक्षण नोंदवले. पुढे गॅलेलिओ यांनी अवकाश निरिक्षणासाठी अधिक चांगली दूरदर्शिका घडवली. विद्यापिठांतून गणित शिकवत असतानाच त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक सिद्धांत मांडले. केपलर व गॅलेलिओ हे दोघे समकालीन खगोलशास्त्रज्ञ होते. केपलर यांनी खगोलशास्त्र, गणित, तसेच भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात मोलाचे काम केले.

साधारणतः १४व्या शतकापासून पृथ्वीवर अवतरलेले छोटे शीतयुग १७व्या शतकात म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळात शिखरावर पोहचले. हवामान बदलाचा पिक-पाण्यावर विपरीत परिणाम झाल्याने महाराष्ट्रासह जगभर दुष्काळ पडला. त्यातून अन्नधान्याची विवंचना निर्माण झाली व रोगराई पसरली. अशाने जागतिक लोकसंख्या काहीप्रमाणात रोडावली. या सगळ्या घडामोडींची अप्रत्यक्ष परिणिती म्हणून जगभरात मोठे सत्ताबदल झाले. 

दरम्यान महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला असला, तरी महाराष्ट्रातील संत परंपरा अबाधित होती. कदाचित संतांच्या विचारांतूनच स्वातंत्र्याची उर्मी येथील लोकांच्या हृदयात निर्माण झाली असावी. १६४७ साली तोरणागड जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची तसेच सुराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजी महाराज पराक्रमाची शर्थ करत असताना संत तुकाराम महाराज आपल्या अभंगांद्वारे महाराष्ट्रातील समाजमन जागे करत होते. याच काळात समर्थ रामदास स्वामींनी देखील महाराष्ट्रात प्रबोधनात्मक कार्य केले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात उभारलेल्या स्वराज्याचे पुढे जाऊन मराठा साम्राज्यात रुपांतर झाले.

१७व्या शतकात ब्रिटिशांनी भारतीय उपखंडातील विविध शहरांत व्यापाराकरिता वखारी उभारल्या. ते भारतीय उपखंडातील राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन होते. शिवाजी महाराजांनी गाजविलेल्या मोहिमांच्या बातम्या इंग्लंडमधील वृत्तपत्रातून छापून येत असत. याच काळात आयझॅक न्यूटन इंग्लंडमध्ये गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करत होते. हे काम करत असताना त्यांनी गतीविषयक काही मूलभूत नियमही मांडले. न्यूटन यांच्या कार्यामुळे वैज्ञानिक जगतास नवी कलाटणी मिळाली. त्याच शतकात मायक्रोस्कोपची देखील निर्मिती झाली. त्यामुळे संशोधकांसाठी एक नवे विश्व खुले झाले.

यादरम्यान पास्कल यांनी अथक प्रयत्न करुन एक यांत्रिक गणकयंत्र (मेकॅनिकल कॅलक्युलेटर) तयार केले. १६४५ साली त्यांनी त्याचे सर्वांसमोर सादरीकरण केले. या गणकयंत्राच्या सहाय्याने बेरीज व वजाबाकी करता येत असे. ‘अरिदमॅटिक मशिन’ नावाचे हे गणकयंत्र पुढे ‘पास्कलाईन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या यंत्रात गिअरचा कौशल्याने वापर करण्यात आला होता. ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’मध्ये वापरण्यात आलेले गिअरचे तंत्रज्ञान हे कधीही पूर्णपणे विस्मृतीत गेले नाही, तर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शेकडो वर्षं टिकून राहिले, याचा ‘पास्कलाईन’ हा जणू एक पुरावा होता! गिअरचा कल्पकतेने वापर करुन तयार करण्यात आलेली अशाप्रकारची निरनिराळी यंत्रे पुनरूत्थान काळात सर्वत्र दिसू लागली होती.

पास्कलाईन – यांत्रिक गणकयंत्र

पास्कल यांनी फ्रांसच्या राजाकडून आपल्या यंत्राकरिता पेटंटसदृश हक्क मिळवले, तसेच आपल्या यंत्राचे व्यवसायिकरण करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले. भविष्यात अशाचप्रकारे तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने उद्योगधंद्यांची जडणघडण होत गेली. म्हणूनच पास्कल यांनी त्यासंदर्भात दाखवलेली दृष्टी विशेष उल्लेखनीय ठरते.

मागील भाग : व्यवहार व कालमापन : ॲबॅकस, अँटिकिथरो मेकॅनिझम

पुढील भाग : चार्ल्स बॅबेज – अचूक आकडेमोड