१८३३ साली चार्ल्स बॅबेज यांनी दिलेल्या एका मेजवानीत त्यांची एडा नावाच्या मुलीशी ओळख झाली. एडा लव्हलेस हीचा जन्म १० डिसेंबर १८१५ रोज इंग्लंडमधील लंडन या शहरात झाला होता. ती एका प्रसिद्ध कवीची मुलगी होती. ती जन्मल्यानंतर काही काळातच तिचे आई-वडिल ऐकमेकांपासून वेगळे झाले. त्यामुळे एडाला लहानपणी मुख्यतः तिच्या आजीनेच सांभाळले. एडाने तिच्या वडिलांप्रमाणे साहित्याकडे वळून जगावेगळे वागू नये, असे एडाच्या आईला वाटत होते. म्हणून तिने तिला गणिताची गोडी लावली.

चार्ल्स बॅबेज यांनी एडाला डिफरन्स इंजिनचा पूर्ण झालेला भाग दाखवला आणि तिच्यासमोर ॲनॅलिटिकल इंजिनची कल्पना मांडली. समकालिन लोकांना चार्ल्स यांच्या कार्याची फारशी समज नव्हती. पण एडाला मात्र त्यांच्या यंत्राचे भविष्यातील महत्त्व लक्षात आले. पुढे दोन वर्षांतच एडाचे सुस्थळी लग्न पार पडले. पण लग्नानंतरही त्यांनी गणिताची आपली आवड जोपासली. त्यामुळे पुढील विस वर्षं चार्ल्स बॅबेज आणि एडा लव्हलेस ॲनॅलिटकल इंजिनवर विचारविनिमय करत राहिले.

एकदा एका इटालियन गणितज्ञाने बॅबेज यांचे ॲनॅलिटिकल इंजिनवरील व्याख्यान ऐकले. त्यानंतर त्याने फ्रेंच भाषेत त्या यंत्राचे थोडक्यात वर्णन लिहिले. बॅबेज यांनी १८४३ साली एडा लव्हलेस यांना त्या वर्णनाचे इंग्लिश भाषांतर करण्यास सांगितले. यासोबतच त्या वर्णनाच्या अनुषंगाने ॲनॅलिटिकल इंजिनसंदर्भात अधिकची माहिती लिहिण्याबाबत सुचवले. त्यानंतर त्यांच्या दरम्यान याबाबत पुढील दोन वर्षं पत्रव्यवहार चालला. एडा लव्हलेस यांनी भाषांतराचे काम केले व ॲनॅलिटिक इंजिन संदर्भात अधिकची माहिती लिहून काढली. त्यांच्या या लेखनामुळेच आज ॲनॅलिटिकल इंजिनबाबत विस्तृत अशी माहिती उपलब्ध आहे.  

‘ॲनॅलिटिकल इंजिन’ ही एक व्यापक कल्पना होती. या यंत्राच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचे गणित सोडवता येईल, असे चार्ल्स बॅबेज यांना मनोमन वाटत होते. ॲनॅलिटिकल इंजिनची कल्पना ही आजच्या संगणकाशी साधर्म्य साधणारी होती. याकारणानेच त्यांना संगणकाचा जनक मानले जाते.

‘ॲनॅलिटिकल इंजिन’मध्ये ‘मिल’ आणि ‘स्टोअर’ असे दोन मुख्य घटक होते. ‘मिल’ हा घटक आजच्या संगणकातील ‘CPU’ सारखा होता, तर ‘स्टोअर’ हा घटक ‘मेमरी’ सारखा होता. मानवी संदर्भात सांगायचे झाल्यास ‘मिल’ हा घटक निर्णय घेणार्‍या ‘मेंदू’ सारखा होता, तर ‘स्टोअर’ हा घटक त्यातील ‘स्मृती’ सारखा होता. डोळे, कान, नाक, अशा ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून माणसास बाहेरील जगाची माहिती मिळते. त्यानंतर त्या माहितीनुसार तो आपले निर्णय घेतो व जीवनातील प्रश्न सोडवतो. त्याचप्रमाणे संगणकासही प्रश्न सोडवण्याकरिता आवश्यक ती माहिती पुरवावी लागते. ॲनॅलिटिकल इंजिनला ‘पंच कार्ड्स’च्या मदतीने आवश्यक ती माहिती पुरवली जाणार होती.

१८०१ साली जोसेफ जॅकयार्ड यांनी पंच कार्ड्स तयार करण्याकरिता एक यंत्र विकसित केले होते. जॅकयार्ड यांच्या पंच कार्ड्सचा वापर हा त्याकाळी विणकामात होत होता.  बॅबेज यांना त्यातूनच संगणकासाठी पंच कार्ड्स वापरण्याची कल्पना सुचली असावी. आज या कामासाठी कीबोर्डसारख्या साधनांचा वापर केला जातो.

ॲनॅलिटिकल इंजिनमध्ये आवाजाकरिता एक ‘घंटा’ समाविष्ट करण्यात येणार होती. जेणेकरुन काही अडचण आल्यास त्यासंदर्भातील सूचना मिळू शकली असती. बॅबेज यांच्या डिफरन्स इंजिनप्रमाणेच ॲनॅलिटिकल इंजिनमध्ये देखील प्रिंटरची योजना होती. पण दूर्देवाने चार्ल्स बॅबेज यांच्या हयातीत ॲनॅलिटिकल इंजिनचा केवळ काही भागच पूर्ण होऊ शकला.

डिफरन्स इंजिन - चार्ल्स बॅबेज
डिफरन्स इंजिन – चार्ल्स बॅबेज

कोणत्याही प्रकारचे गणित सोडवण्यासाठी ॲनॅलिटिकल इंजिनचा उपयोग करता येईल, असे बॅबेज यांना वाटत होते. पण त्या यंत्राचे गणितापलिकडील महत्त्व एडा लव्हलेस यांच्या लक्षात आले होते. ॲनॅलिटिकल इंजिनचा उपयोग हा केवळ गणित सोडवण्यासाठी नव्हे, तर संगीत ऐकण्यासाठी देखील करता येईल, अशी त्यांची भविष्यवेधी दृष्टी होती. ॲनॅलिटिकल इंजिनसाठी त्यांनी एक अज्ञावली (Program) देखील लिहिली होती. त्याधारे अनेक लोक त्यांना जागातील पहिली अज्ञावलीकार (Programmer) मानतात. भविष्यात अंकांसोबतच चिन्हांवरही काम करता येईल, असे त्यांनी नमूद केले होते. एडा लव्हलेस यांनी ॲनॅलिटिकल इंजिनवर एक पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली होती, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. २८ नोव्हेंबर १८५२ रोजी एडा लव्हलेस यांचे वयाच्या केवळ ३६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या ईच्छेनुसार मृत्यूपश्चात त्यांची शवपेटी त्यांच्या वडिलांच्या शेवपेटीशेजारी दफन करण्यात आली.

चार्ल्स बॅबेज त्यांच्या अंतिम वर्षांत वैतागलेल्या मनःस्थितीत असत. त्यातच रस्त्यावर संगीत वाजवणारे लोक बॅबेज यांच्याप्रती असलेला राग मनात धरुन त्यांच्या घरासमोर मुद्दामहून संगीत वाजवत. १८ ऑक्टोबर १८७१ रोजी चार्ल्स बॅबेज यांचे वयाच्या ७९व्या वर्षी लंडन येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मेंदूचे दोन भाग दोन वेगवेगळ्या संग्रहालयात जतन करुन ठेवण्यात आलेले आहेत.

बॅबेज यांनी तत्कालीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संगणक तयार करण्याचा मोठा खटाटोप केला. पण त्यावेळच्या परिस्थितीत ते त्यांच्या कल्पनांना मूर्तरुप देऊ शकले नाहीत. चार्ल्स बॅबेज हे काळाच्या पुढील व्यक्तीमत्त्व होते. त्यामुळे ‘ॲनॅलिटिकल इंजिन’ सारखा ‘प्रोग्रॅमेबल संगणक’ पाहण्याकरिता या जगास पुढील शंभर वर्षं वाट बघावी लागली.

दरम्यान मध्ययुगीन महाराष्ट्र कात टाकू लागला होता. पाश्चत्य ज्ञानाने महाराष्ट्रातील नवी पिढी प्रभावित झाली होती. यातुनच पुढे सामाजिक सुधारणा सुरु झाल्या. माहात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, असे महान समाजसुधारक तत्कालीन महाराष्ट्रातील लोकजीवन घडवत होते.

मागील भाग : डिफरन्स इंजिन – चार्ल्स बॅबेज