आपण पुस्तक लिहावे ही माझी अगदी लहानपणापासूनची इच्छा! या पुस्तकाच्या निमित्ताने आज तसा योग जुळून येत आहे, याचे मला अत्यंत समाधान आहे. साधारण वर्षभरापूर्वी या पुस्तकाची कल्पना माझ्या मनात डोकावली. त्यानंतर या पुस्तकाचे एक एक पान हळूहळू माझ्यासाठी उलगडत गेले! पुस्तक लिहित असताना आपण आपल्या पुस्तकासह एक समांतर आयुष्य जगत असतो. आपण पुस्तकाकडून काही शिकत असतो, तेंव्हा पुस्तकही आपल्याकडून काही शिकत असते. अशाने दोघांनाही एक नवी दृष्टी प्राप्त होते! या विस्तारलेल्या दृष्टीकोनातून दिसणारे आयुष्याचे नवे क्षितीज वाचकांसमोर अलगदपणे उलगडत जाते!

तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रवासामागे त्यामागील माणसांची अथक वाटचाल दडलेली असते. म्हणूनच ‘संगणकाची गोष्ट’ या पुस्तकात केवळ संगणकाचा आजवरचा प्रवास मांडण्यात आलेला नाही, तर संगणकामागील माणसांच्या आयुष्याची वाटचालही दर्शवण्यात आली आहे. या जगात आकार घेणार्‍या प्रत्येक गोष्टीची जडणघडण ही तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने होत असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीबाबत जाणून घ्यायचे झाल्यास त्यावेळच्या एकंदरीत स्थितीची जाणीव असणे अत्यावश्यक ठरते. हे पुस्तक लिहित असताना याबाबतचा विचार करण्यात आलेला आहे. अशाने हे पुस्तक वाचत असताना संगणकाव्यतिरिक्तही पुष्कळ गोष्टींची माहिती होईल.

आज हे पुस्तक पूर्ण होत असले, तरी या पुस्तकाचा प्रवास आता खर्‍या अर्थाने सुरू होत आहे. हे पुस्तक आपल्या हाती देत असताना मला एकप्रकारचे आंतरिक समाधान व मोकळेपणा जाणवत आहे. आपणास हे पुस्तक आवडेल, त्याबाबत आपुलकी वाटेल अशी आशा आहे!

संगणकाची गोष्ट – मुखपृष्ठ

पुढील भाग : व्यवहार व कालमापन : ॲबॅकस, अँटिकिथरो मेकॅनिझम