जीवनाची अपरिहार्यता माणसास अनेक गोष्टी शिकवते. ‘व्यवहार’ व ‘काळ’ या अशाच दोन अपरिहार्य गोष्टी आहेत. या गोष्टी अपरिहार्यतेने करता करता माणूस आपल्या मनात त्यांचा अर्थ लावू लागतो, आपल्या दृष्टीकोनातून त्यांची सांगड घालू लागतो. काळाचा हा व्यवहार अधिक कार्यक्षमतेने कसा करता येईल!? यादृष्टीने तो वरचेवर प्रयत्नशील राहतो. यातून त्याला स्वतःस अनेक गोष्टी उलगडत जातात, ज्या तो ज्ञानरुपाने पुढील पिढीस हस्तांतरित करतो. मानवी इतिहासावर नजर टाकली असता आपणास अशाप्रकारे मानवी व्यवहाराची काळाशी सांगड घातलेली दिसून येते. हा सारा व्यवहार सोपा जावा याकरिता आपल्या पूर्वजांनी निरनिराळी उपकरणे विकसित केली. त्यातूनच यथावकाश मानवी संस्कृतीच्या प्रगतीस हातभार लागला.

ॲबॅकस

गणित हा कोणत्याही व्यवहाराचा अविभाज्य भाग आहे. गणिताची व्यवहारातील क्लिष्टता सोडविण्यासाठी मानवी पूर्वजांनी प्राचीन काळी ‘ॲबॅकस’ नावाचे उपकरण विकसित केले. या उपकरणाचा जगभरातील निरनिराळ्या प्राचीन संस्कृतींमध्ये वापर केला जात असे. हे उपकरण इतके कार्यक्षम होते की, आजही काही ठिकाणी याचा उपयोग केला जातो. इतर कोणत्याही उपकरणाप्रमाणे ॲबॅकसचा देखील कालपरत्वे विकास होत गेला. अगदी प्राचीन काळापासून अनेक मानवी व्यवहार या उपकरणाने सोडवलेले आहेत.

ॲबॅकस
ॲबॅकस

अँटिकिथरो मेकॅनिझम    

सभोवतालच्या गोष्टींचे निरिक्षण करता करता माणूस एक दिवस अचानकच स्वतःजवळ येऊन थबकतो. तेंव्हा त्यास स्वतःच्या अस्तित्त्वाचे आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. कर्तव्यपूर्तीचे क्षण मोजून थकलेली त्याची नजर मिणमिणत्या तार्‍यांमध्ये काही काळ हरखून जाते. नकळतच तो आपल्या अस्तित्त्वाची मर्यादा ग्रह-तार्‍यांमध्ये मोजू लागतो. काळाच्या कसोटीवर आयुष्याची इतिकर्तव्यपुर्ती व्हावी या जाणिवेतून तो काळाची गणिते मांडतो, आणि कालगणना त्याच्या आयुष्यास आकार देते.

प्राचीन काळी निसर्ग हा मानवी जीवनाचा आरसा होता. त्यामुळे माणसाने आपसुकच आपले आयुष्य निसर्गचक्रात गुंफून टाकले. निसर्गाच्या स्वभावातून बहुरंगी सण, उत्सव मानवी आयुष्यात अवतरले. सोबतच निरनिराळ्या रुढी, परंपरा देखील अस्तित्त्वात आल्या. या सार्‍याचा आयुष्याशी ताळमेळ साधायचा झाल्यास कालगणना आवश्यक होती. शिवाय शेती, उद्योग या दृष्टीनेही वेळेचे भान राखणे आगत्याचे होते. त्यासाठी मानवी पूर्वजांनी ग्रहगोलांच्या परिभ्रमणाची आपल्या दैनंदिन आयुष्याशी सांगड घातली.

याची सुरुवात सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी भूमध्य समुद्राच्या प्रदेशात झाली. भूमध्य समुद्राच्या उत्तरेस युरोप, दक्षिणेस आफ्रिका, तर पूर्वेस आशिया खंड आहे. त्यामुळे व्यापारउदीमाच्या दृष्टीने हा तसा मोक्याचा प्रदेश म्हणावा लागेल! व्यापार हे अर्थप्राप्तीचे एक उत्तम साधन आहे. अर्थार्जनाने जगण्याची दैनंदिन विवंचना मागे पडते. मोकळा वेळ प्राप्त होता मानवी जिज्ञासेला वाव मिळतो. त्यातून जीवनाला कलाटणी देणारे शोध लागतात, नितांत सुंदर कलाकृती साकार होतात.

भूमध्य समुद्राच्या उत्तरेस ग्रीस देश वसला आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी तो अनेक स्वायत्त शहरांत विभागला होता. त्या शहरांचे परस्परांशी मित्रत्त्वाचे संबंध होते, तसेच आपापसांत वैमनस्यही होते. पर्शियन आक्रमणे व परस्पर कलह यामुळे लहान-सहान ग्रीक राज्ये कमकुवत झाली. तेंव्हा मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने ग्रीस आपल्या ताब्यात घेतला. जग जिंकण्याची महात्त्वाकांक्षा बाळगणारा ‘अलेक्झांडर द ग्रेट’ हा राजा फिलिपचा मुलगा होता. अलेक्झांडरने थेट पंजाबपर्यंत आपला साम्राज्यविस्तार केला. त्यावेळी महाराष्ट्रात सातवाहन राजे राज्य करत होते. अलेक्झांडरचे साम्राज्य हे जगातील तोपर्यंतचे सर्वांत मोठे साम्राज्य होते. अलेक्झांडरच्या मृत्यूपश्चात त्याच्या साम्राज्याचे विघटन झाले. पुढे रोमन साम्राज्याने ग्रीसचा ताबा घेतला.

या सर्व घडामोडींदरम्यान ग्रीक संस्कृतीचा उत्कर्ष होत होता. तत्वज्ञान, शिल्पकला, स्थापत्यकला, नाट्यकला, चित्रकला, संगीत, क्रिडा, शेती, व्यापार, आरोग्य, भूमिती, इत्यादी अनेक क्षेत्रांत त्याकाळी ग्रीकांनी मोठी मजल मारली होती. ‘लोकशाही’ ही तर ग्रीसने जगाला दिलेली देणगी मानली जाते.

आजपासून सुमारे शंभर वर्षांपूर्वी या प्राचीन ग्रीक कालखंडातील एक अत्यंत रहस्यमय वस्तू भूमध्य समुद्राच्या तळाशी अनपेक्षितपणे सापडली, तेंव्हा ती वस्तू आभ्यासणाऱ्या प्रत्येकाचे मन स्तिमित झाले!

१९०० साली आलेल्या एका सागरी वादळात अँटिकिथरो बेटानजीक ‘स्पंज डायव्हर’चे एक जहाज भरकटले. तेंव्हा जहाजाने त्या छोट्याशा खडकाळ बेटाजवळच काही काळ आसरा घेतला. तीन दिवसांनी वादळ सरले. ते बघता जहाजप्रमुखाने त्याच भागात काही स्पंज मिळतात का? ते सहज म्हणून पहायचे ठरवले. यास्तव जहाजावरील एका स्पंज डायव्हरने तेथील समुद्रात डुबकी मारली. समुद्रतळ बराच खोल होता. समुद्रतळाशी पोहचल्यानंतर स्पंज डायव्हरला जे चित्र दिसले, त्याने तो अगदीच भयचकित झाला! त्याच्या आसपास कुजलेले मानवी शव इतस्तः विखुरले होते. स्पंज डायव्हर घाबराघुबरा होऊन पुन्हा जहाजावर परतला. नक्की काय झाले!? हे कोणालाच नीट समजले नाही. तेंव्हा जहाजप्रमुखाने कुतूहल म्हणून दुसर्‍या एका डायव्हरला समुद्रतळाशी पाठवले. दुसर्‍या डायव्हरने समुद्रतळाचे नीट निरिक्षण केले. स्विकृतदर्शनी जे मानवी शव दिसत होते, ते प्रत्यक्षात प्राचीन शिल्पाकृतीचे अवशेष असल्याचे त्यावेळी समोर आले. प्राचीन ग्रीक संस्कृतीचा आत्तापर्यंत सापडलेला तो सर्वांत मोठा ठेवा होता. पुरातन परंतु नितांत सुंदर अशा ग्रीक कलाकृती एव्हढा काळ आपल्या भवितव्याची वाट पहात समुद्रतळाशी पहुडल्या होत्या.

प्राचीन ग्रीक संस्कृतीचे अवशेष सापडल्याची बातमी सर्वत्र पसरली. मिळालेल्या वस्तू या कोणे एके काळी जलसमाधी मिळालेल्या जहाजावरील असाव्यात, हे एव्हाना स्पष्ट झाले होते. तेंव्हा पुढील नऊ महिन्यांत अनेक ग्रीक कलाकृती व वस्तू जमिनीवर आणण्यात आल्या. अशाप्रकारे एक सुंदर असा प्राचीन ठेवा मानवी इतिहासात विराजमान झाला. आपल्या कालातीत भव्यतेची साक्ष देणार्‍या पुरातन कलाकृतींनी जगाला मंत्रमुग्ध केले. आपले पूर्वज हे आपल्या समजूतीहून कितीतरी अधिक प्रगत होते ही जाणीव सर्वांनाच चकीत करुन गेली.

तरी या सर्व प्राचीन कलाकृतींमध्ये अशी एक रहस्यमय वस्तू होती जिचा अजूनही उलगडा व्हायचा होता. अँटिकिथरो बेटानजीक समुद्रतळाशी सापडलेल्या या वस्तूला तज्ञांनी ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ असे नाव दिले. ब्रांझ धातूपासून बनलेली ही रहस्यमय वस्तू पुरती गंजून गेली होती. त्यामुळे लवकरच तिचे तुकडे झाले. त्यातील मोठ्या तुकड्यांचे एक्स-रे छबीच्या सहाय्याने जवळून परिक्षण केले असता, तज्ञांना त्यात घड्याळात असतात, तसे लहान आकाराचे गिअर दिसून आले. त्यावरुन हे एखादे प्राचीन यंत्र असावे असा त्यांनी कयास बांधला. परंतु ही गोष्ट आजवरच्या समजूतीला तडा देणारी होती. असा विचारही जणू तोपर्यंत कल्पनातीत होता! तेंव्हा तज्ञांनी या यंत्राचे रहस्य उलगडण्याचे मनावर घेतले व ‘त्याकाळी नेमके काय घडले असावे?’ याचा ठाव घेण्यास सुरुवात केली. त्याकरिता अगदी भगिरथ प्रयत्न केले! परिणामी मानवी इतिहासाचे विस्मृतीत गेलेले तुकडे एक एक करुन जुळू लागले.

१९७६ साली अँटिकिथरो येथील त्याच समुद्रतळाशी पुन्हा एकदा एक शोधमोहीम काढण्यात आली. त्यावेळी तिथे काही पुरातन नाणी व मद्याची भांडी सापडली. त्यावरुन तज्ञांनी जलसमाधी मिळालेल्या जहाजाची कालनिश्चिती केली. शिवाय ते जहाज कुठून कुठे जात असावे? याचा देखील अंदाज बांधला. या जहाजास जलसमाधी मिळाली तो काळही मोठा वादळी होता!

ग्रीक हे उत्कृष्ट दर्यावर्दी होते. अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी त्यांनी जवळपासच्या प्रदेशात आपल्या वसाहती निर्माण करण्यास सुरुवात केली होती. टर्कीच्या पूर्वेस व इटलीच्या दक्षिणेस त्यांच्या अशाच काही वसाहती होत्या. पुढे सुमारे २१०० वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याचा उदय होऊ लागला. इटलीतील सत्तेने ग्रीक वसाहती ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. याच काळात तेंव्हाच्या मानाने भलेमोठे असे एक रोमन जहाज टर्कीच्या पूर्व किनार्‍यावरील वसाहतीतून प्रवासास निघाले असावे. या व्यापारी जहाजास इटलीच्या दक्षिण किनार्‍यावरील वसाहतीपर्यंत पोहचायचे होते. परंतु अँटिकिथरो बेटानजीक त्यास समुद्री वादळाने घेरले व दूर्देवाने त्याला तिथेच जलसमाधी मिळाली. मात्र जहाजावरील मानवी संस्कृतीचा ठेवा हा समुद्राने शेकडो वर्षं आपल्या उरी जतन करुन ठेवला.

समुद्रतळाशी सापडलेल्या जीर्ण अशा त्या यंत्राचे रहस्य उलगडायचे झाल्यास कुठूनतरी सुरुवात करणे गरजेचे होते. त्यासाठी एक्स-रे छबीचे नीट काळजीपूर्वक निरिक्षण करण्यात आले. तेंव्हा यंत्राच्या उपलब्ध भागात एकूण २७ गिअर असल्याचे समजले. लहान-मोठ्या आकाराचे हे गिअर दाटीवाटीने परंतु मोठ्या कुशलतेने बसवण्यात आले होते. तरी ‘या सर्व गिअरचे नेमके प्रयोजन काय असावे!?’ हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. बुचकळ्यात टाकणार्‍या या प्रश्नाचे उत्तर शोधणे हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे होते!

त्यादृष्टीने ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’च्या आतील गिअरचे दात मोजण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु एक्स-रे मधून जी काही द्विआयामी छबी प्राप्त झाली होती, त्यात सारे गिअर एकरुप दिसत होते. शिवाय त्या यंत्राचा काही मर्यादित भागाच त्यामितीला शिल्लक उरला होता. अशावेळी यंत्राच्या आतील गिअरचे दात मोजणे बरेच कठीण होते. परंतु त्या यंत्राभोवती औत्सुक्याचे एक रहस्यमयी वलय होते. त्यामुळे त्यावरील संशोधन हे मोठ्या निर्धाराने सुरु राहिले.

गूढ अशा ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’मध्ये २३५, १२७ आणि १९ दातांचे तीन गिअर असल्याचे पहिल्याप्रथम तज्ञांच्या निदर्शनास आले. त्यापैकी १२७ आणि १९ या दोन मूळ संख्या होत्या. कोणत्याही मूळ संख्येला केवळ एकने व स्वतः त्या मूळ संख्येनेच भाग जातो. या सर्व संख्या ग्रीक खगोलशास्त्रात महत्त्वाच्या होत्या. चंद्राचे पृथ्विभोवतालचे परिभ्रमण हे या संख्यांमधून व्यक्त होत होते. यावरुन ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ हे कालमापणाशी निगडीत असल्याचे तज्ञांच्या लक्षात आले.  

परंतु या यंत्राभोवतालचे रहस्य अजूनही पुरते उलगडले नव्हते. या यंत्रात असे अनेक गिअर होते, ज्यांचे प्रयोजन समजणे बाकी होते. द्विआयामी एक्स-रे छबीमधून तज्ञांना या यंत्राबाबत अंशतः माहिती मिळाली खरी! परंतु अधिक माहिती मिळविण्याकरिता आणखी प्रगत अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. त्याचवेळी एखाद्या वस्तूची त्रिमितीय एक्स-रे छबी तयार करु शकेल, असे अत्याधुनिक तंत्रज्ञान इंग्लंडमध्ये विकसित करण्यात आल्याचे तज्ञांना समजले. परंतु हे तंत्रज्ञान जीर्ण अशा ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’पर्यंत पोहचवणे हे एक आव्हान होते. तज्ञांनी व तंत्रज्ञांनी त्यासाठी मोठा खटाटोप केला. अखेर ते खास त्रिमितीय एक्स-रे यंत्र ग्रीसमधील संग्रहालयापर्यंत प्रयत्नांती आणण्यात आले. तिथे ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ची त्रिमितीय छबी काढण्यात आली. त्यामुळे त्या प्राचीन यंत्राचे आणखी काही अज्ञात पैलू समोर आले.

अँटिकिथरो मेकॅनिझमचे अवशेष
अँटिकिथरो मेकॅनिझमचे अवशेष

‘अँटिकिथरो मेकॅनिझम’चा जवळपास अर्धा भागच त्यामितीस शिल्लक उरला होता. तरी त्यात एकून २७ गिअर असल्याचे त्रिमितीय छबीमध्ये दिसत होते. पूर्णस्वरुप यंत्रात कदाचित याहून अधिक गिअर असले असते. या छबीमुळे प्रत्येक गिअरची स्थाननिश्चिती करण्यास देखील मदत झाली. परंतु ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’बाबत अजूनही बर्‍याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या होत्या. त्याकरिता त्यावरील अस्पष्टासा लिखित मजकूर उद्धृत करणे गरजेचे होते. त्यासाठी पुन्हा एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.

‘अँटिकिथरो मेकॅनिझम’वरील अस्पष्ट मजकूर उधृत केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत झाली. याकामी प्राचीन ग्रीक भाषा तज्ञांची मदत घेण्यात आली. उपलब्ध मजकूराचा आभ्यास केला असता तज्ञांना जे आढळले, ते अगदी थक्क करणारे होते! भविष्यात ‘चंद्रग्रहण’ व ‘सूर्यग्रहण’ कधी होईल? याचा अचूक कयास ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’च्या सहाय्याने त्याकाळी बांधता यायचा. एव्हढेच नव्हे! तर ग्रहण किती वाजता होईल? ग्रहणाच्या सावलीची दिशा कोणती असेल? चंद्रग्रहणाचा रंग कोणता असेल? ही सारी विस्तृत माहिती त्या यंत्राच्या सहाय्याने मिळू शकत असे.

पण प्राचीन ग्रीक लोकांना हे सारे का जाणून घ्यावेसे वाटले असेल!? आणि ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’च्या जडणघडणीमागे कोणाचा हात असावा? प्राचीन काळातील जीवन हे अत्यंत अस्थिर होते. अनियंत्रित निसर्ग, रोगरोई, आपापसांतील लढाया, अशा कारणांमुळे त्याकाळी मानवी जीवनास शाश्वती नव्हती. आयुष्याची खात्री नसेल, तर भयभित मन कशाचा तरी आधार शोधू लागते. हा आधार शोधणारी आगतिकता माणसास अंधश्रद्धेच्या उंबरठ्यावर घेऊन जाते. प्राचीन लोक जसे श्रद्धाळू होते, तसेच ते अंधश्रद्धाळू देखील होते. चंद्राला लागलेल्या लाल ग्रहणास ते अशुभ मानत असत. त्यामुळे लाल चंद्र नेमका कधी दिसेल? हे जाणने त्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे असायचे. याशिवाय निरनिराळ्या रुढी, परंपरा, उत्सव हे वेळेनुसार साजरे करायचे झाल्यास कालगणना आवश्यक होती. सोबतच पिक-पाणी, व्यापार-उदिम यादृष्टीनेही वेळेचे नियोजन महत्त्वाचे होते. मानवी पूर्वजांनी आपले आयुष्यच जणू अवकाशातील ग्रहगोलांमध्ये गुंफले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण दैनंदिन जीवनाची ग्रहगोलांशी सांगड घालणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी गणित व खगोलशास्त्राचा सखोल आभ्यास गरजेचा होता.

व्यवहार हा मानवी सहजीवनाचा अपरिहार्य भाग असल्याने अगदी पुरातन काळापासून निरनिराळ्या संस्कृतींचा आपापसांत व्यापार चालत असे. त्यायोगे ऐकमेकांसोबत ज्ञानाचीही देवाणघेवाण होऊ लागली. भूमध्य समुद्राभोवती विकासित झालेल्या मानवी संस्कृतींचा अशाप्रकारे उत्कर्ष होत गेला. परंतु गणिताशिवाय कोणताही व्यवहार पूर्ण होत नाही. वस्तूंची देवाणघेवाण करण्यापासून ते एखादी भव्य वास्तू उभारेपर्यंत सर्वत्र गणिताचा वापर केला जातो. पुरातन ग्रीक संस्कृतीतही याकरणाने  भूमितीचा सखोल आभ्यास करण्यात आलेला दिसून येतो. त्यांच्या कल्पक, विस्मयकारक व नितांत सुंदर अशा स्थापत्यकलेचा भूमिती हा जणू पायाच होता! याशिवाय खगोलशास्त्राच्या अनुषंगानेही प्राचीन लोकांच्या जीवनात गणिताचा प्रवेश झाला. अवकाशातील ग्रह-तारे हे त्यांच्या देवदेवतांचे प्रतिनिधित्व करत असत!

पोर्णिमा ते अमावस्या यादरम्यान चंद्रकला टप्याटप्याने बदलत जातात. अशाने चंद्राकडे पाहून महिन्यातील दिवसांची नोंद ठेवणे सोपे जाते. म्हणूनच जुन्या काळी कालगणना ही चंद्राच्या अनुषंगाने होत असल्याचे दिसून येते. परंतु वर्षातील ऋतू हे सूर्यानुसार बदलत जातात. त्यामुळे वर्षाकाठी कुठेतरी चंद्राची व सूर्याची सांगड घालणे आगत्याचे ठरते. प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी चंद्राच्या व सूर्याच्या वर्षभरातील वाटचालीचे सूक्ष्म निरिक्षण नोंदवले होते. यातूनच त्यांना या ग्रहगोलांच्या हालचालींची गणितीय मांडणी करणे शक्य झाले. परंतु ग्रहगोलांची हालचाल गिअरच्या सहाय्याने एका छोट्याशा यंत्रात प्रतिबिंबित करणे, हे एक वेगळेच आव्हान होते! त्याकरिता खूप मोठ्या कल्पनाशक्तिची गरज होती.

‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ या यंत्रामागे नेमकी कोणाची प्रेरणाशक्ती असावी!? याचा वेध घेतला असता, आर्किमिडीज हे नाव चटकन पुढे येते! आर्किमिडीज हे त्याकाळातील एक अत्यंत ख्यातनाम गणितज्ञ, संशोधक व शास्त्रज्ञ होते. तत्कालीन वैज्ञानिक जगात त्यांचे कार्य दिशादर्शक ध्रुव तार्‍याप्रमाणे होते. त्यामुळे ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’सारख्या यंत्राच्या जडणघडणीत त्यांचा हात असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जाते.

आर्किमिडीज यांचा जन्म इसवी सन पूर्व २८७ साली झाला. त्यांचे बालपण सिसिली येथील सेरेक्यूज या ग्रीक वसाहतीत गेले. सिसिली हा मूळतः इटलीचा दक्षिणेकडील भाग होता. पुढे शिक्षण घेण्यासाठी आर्किमिडीज यांनी इजिप्तमधील ‘ॲलेक्झांड्रिया’ या शहराकडे प्रस्थान केले. पंजाबमधील मोहिमेवरुन परतल्यानंतर इसवी सन पूर्व ३३१ साली ॲलेक्झांडर द ग्रेटने इजिप्तच्या उत्तरेस ‘ॲलेक्झांड्रिया’ नावाचे शहर वसवले होते. त्यानंतर लवकरच ॲलेक्झांड्रिया हे एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र बनले. या शहरात प्राचीन काळातील भव्य असे वाचनालय होते. तिथे शिकण्याकरिता जगभरातून लोक येत असत.

त्याच सुमारास टसिबिअस नावाच्या गणितज्ञाने कालमापनासंदर्भात मौल्यवान संशोधन केले असल्याचे समजते. त्यांनी कालमापनासाठी एक यंत्रही विकसित केले होते. अगदी तेंव्हापासूनच यंत्रांमध्ये गिअरचा वापर करण्यात येत होता. ॲलेक्झांड्रिया येथील वास्तवव्यात आर्किमिडीज यांच्यावर त्यांच्या कार्याचा प्रभाव पडला असण्याची मोठी शक्यता आहे. आर्किमिडीज यांच्यावर मूळताच दैवी प्रतिभेचा वरदहस्त होता! ते एक अत्यंत कल्पक बुद्धिमत्तेचे व्यक्ती होते. त्यामुळे त्यांनी कालमापनाचे तंत्रज्ञान नव्या उंचीवर नेले असल्यास नवल वाटायला नको! याबाबतचा ओझरता उल्लेखही प्राचीन वर्णनात आढळतो.

ॲलेक्झांड्रिया येथील शिक्षण आटोपून आर्किमिडीज पुन्हा सेरेक्यूज, सिसिली येथे परतले. आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी गणिताच्या क्षेत्रात पुढे महत्वपूर्ण संशोधन केले, तसेच भूमिताचा वापर करुन वैशिष्ट्यपूर्ण अशी नवनवीन यंत्रे बनवली. त्यांनी नेहमीच्या भूमितीय आकारांचे क्षेत्रफळ व वस्तूमान शोधून काढण्याची पद्धत विकसित केली. त्या अनुषंगाने त्यांनी ‘पाय’ या गणितातील महत्त्वपूर्ण संख्येचा अधिक अचूक आकडा शोधून काढला. याशिवाय ‘आर्किमिडीज स्क्रू’ नावाने ओळखले जाणारे एक यंत्र विकसित केले. या यंत्राच्या सहाय्याने जमिनीवरील पाणी उंचावर चढवणे सहजशक्य झाले. वस्तूचा गुरुत्वमध्य शोधून काढण्याबाबतही आर्किमिडीज यांनी मोलाचे संशोधन केले. ‘योग्य टेकू मिळाल्यास मी पृथ्विसुद्धा तरफेच्या सहाय्याने उचलून दाखवीन’, असे त्यांनी म्हटल्याचे सांगण्यात येते.

आर्किमिडीज हे प्रतिभावान व्यक्ती होते. त्यामुळे सेरेक्यूजचा राजा दुसरा हिरो आणि त्यांचा मुलगा गेलो यांच्याशी त्यांचे मित्रत्त्वाचे संबंध निर्माण झाले. सेरेक्यूजचा राजा व आर्किमिडीज यांची एक कथा देखील सांगितली जाते. शाही सोनाराने आपल्या सोन्याच्या राजमुकूटात चांदीची भेसळ केली आहे, असा राजाला एकदा संशय आला. परंतु हे कसे सिद्ध करायचे? ते काही राजाला उमजेना! म्हणून त्यांनी आर्किमिडीजवर ही कामगिरी सोपवली. राजाच्या या कूटप्रश्नाने आर्किमिडीजही कोड्यात पडले. एके दिवशी आंघोळ करत असताना त्यांना अचानक एक कल्पना सुचली व ते ‘युरेका!!!’ असे ओरडत आहे त्या अवस्थेत राजाकडे पोहचले. त्यांनी पाण्याच्या एका भांड्यात अपेक्षित मोलाचे सोने बुडवले व विस्तापित झालेले पाणी मोजले. त्यानंतर त्यांनी राजमुकूट पाण्यात बुडवला व पुन्हा एकदा विस्थापित झालेले पाणी मोजले. अशाप्रकारे त्यांनी राजमुकूटाचे वस्तूमान व त्यावरुन त्याची घनता काढली. त्यानंतर त्यांनी राजमुकूटाच्या घनतेची अपेक्षित सोन्याच्या घनतेशी तुलना केली. तेंव्हा शाही सोनाराने राजमुकूट तयार करत असताना त्यात लबाडी केली असल्याचे उघड झाले. आर्किमिडीज यांच्या चातुर्याने राजा अत्यंत प्रभावित झाला.    

तो राजकीयदृष्ट्या अस्थिर असा कालखंड होता. रोम येथील सत्तेने आपल्या सीमा विस्तारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सेरेक्यूजवर वारंवार आक्रमणे होत असत. आर्किमिडीज यांनी ही आक्रमणे परतवून लावण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी निर्माण केलेले एक यंत्र तटावरील शत्रूंची जहाजे उलथवून टाकू शकत असे. त्यामुळे सेरेक्यूजचा पाडाव करणे हे शत्रूसैन्यास सहजासहजी शक्य झाले नाही. अखेर दोन वर्षं सेरेक्यूजला वेढा दिल्यानंतर फसवणूकीने तेथील ग्रीक राजसत्तेचा पराभव करण्यात आला. रोमन जनरल मार्सेलस यांनी ते शहर नेस्तनाभूत करण्याची आज्ञा दिली. परंतु आर्किमिडीज यांना मात्र अभय देण्यात यावे, अशी आपल्या सैन्यास सूचना केली. एक रोमन सैनिक जेंव्हा आर्किमिडीज यांच्याजवळ पोहचला, तेंव्हा ते आपल्या संशोधनात्मक कार्यात पुरते गढून गेले होते, असे सांगितले जाते. आर्किमिडीज यांनी रोमन सैनिकाच्या बोलण्याकडे दूर्लक्ष केले, तेंव्हा त्याने त्यांस ठार मारले. ही घटना घडली तेंव्हा आर्किमिडीज हे साधारणतः पंचाहत्तर वर्षांचे वयोवृद्ध गृहस्थ होते.

मार्सेलस यांच्या आज्ञेनुसार सेरेक्यूज हे शहर उद्धस्त करण्यात आले. सेरेक्यूजमध्ये केलेली मौल्यवान लूट परतीच्या प्रवासात रोमकडे नेण्यात आली. सोबत आर्किमिडीज यांच्याकडील अत्याधुनिक यंत्रेही होती. त्यात ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’सारखे एखादे यंत्र असावे, असे म्हणण्यास वाव आहे. कारण पुढे दीडशे वर्षांनंतर मार्सेलस यांच्या एका नातवंडाकडे प्रसिद्ध ग्रीक वक्ता सिसरो यांनी आर्किमिडीजचे एक यंत्र पाहिले. ते यंत्र पाहून सिसरो अत्यंत प्रभावित झाले. त्या यंत्राचे वर्णन सिसरो यांनी त्याकाळी लिहून ठेवले. त्यात ‘आर्किमिडीज यांनी मोठ्या कल्पकतेने पाच ग्रहांचे परिभ्रमण आपल्या यंत्रात प्रतिबिंबित केल्याचे’ ते सांगतात. सोबतच अवकाशातील सूर्याचे ग्रहण अचूकतेने दर्शवण्यासही ते यंत्र सक्षम असल्याचे ते नमूद करतात.

आर्किमिडीज यांनी ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’सारखे एखादे यंत्र निर्माण केले असावे, ही शक्यता सिसरो यांच्या नोंदीमुळे अधिक ठळक होते. सिसरो यांच्या नोंदी व्यतिरिक्त ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’च्या अनुषंगाने इतरही काही पुरावे तज्ञांसमोर आले, ज्यानुसार या यंत्राची जडणघडण सिसलीमध्ये झाली असावी असा कयास बांधला गेला. आर्किमिडीज यांच्यानंतर साधारणतः दोनशे वर्षांनी ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ची निर्मिती करण्यात आली होती. तेंव्हा ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ हे आर्किमिडिज यांच्या यंत्राची सुधारित आवृत्ती असावे, अशी शक्यता वर्तवली जाते.

जगप्रसिद्ध ऑलंपिक खेळांची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्येच झाली होती. ऑलंपिकप्रमाणे तेंव्हा आसपासच्या प्रदेशात इतरही काही स्पर्धा नियमितपणे भरवल्या जात. विशेष म्हणजे ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ ऑलंपिकसह तत्कालीन चार प्रमुख स्पर्धांचा काळ अचूकतेने दर्शवू शकायचे. तशी सोय त्या यंत्रात करण्यात आली होती. ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’सारखे प्राचीन यंत्र तब्बल २००० वर्षांनी समुद्रतळाशी सापडावे हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल! हे प्राचीन यंत्र भविष्य वर्तवणार्‍या एखाद्या संगणकाप्रमाणे होते! त्यामुळे अनेकजण ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ला जगातील पहिला मेकॅनिकल संगणक मानतात.

इतके सारे पुरावे मिळूनही, प्राचीन काळी इतके प्रगत तंत्रज्ञान अस्तित्त्वात असावे, यावर विश्वास ठेवणे खरे तर कठीण होते. परंतू सुदैवाने ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’सारखी आणखी काही यंत्रे नंतरच्या काळात जगासमोर आली. ही यंत्रे ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ इतकी प्रगत नसली, तरी त्यात कालमापनासाठी गिअरचा कौशल्याने वापर करण्यात आला होता. त्यामुळे अशाप्रकारचे तंत्रज्ञान त्याकाळी अस्तित्त्वात होते, यावर शिक्कामोर्तब झाला. परंतु पुढे या तंत्रज्ञानाचे काय झाले असावे!?

ग्रीक सत्तांचा पाडाव झाला, तसा रोमन साम्राज्याचा उदय होत गेला. कालप्रवाहात रोमन साम्राज्यही खिळखिळे झाले, तेंव्हा त्या भागात बाझांटाईन साम्राज्य निर्माण झाले. ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’सारखे तंत्रज्ञान असलेले एक अरबी यंत्र १९८३ साली एका संग्रहालयास प्राप्त झाले. त्यावरुन या तंत्राज्ञानाने पुढे जाऊन शेजारील अरब जगतात आपली वाट काढली असावी असे दिसते. सुमारे १५०० वर्षांपूर्वीचे हे अरबी यंत्र ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’प्रमाणे गिअरच्या सहाय्याने चंद्रकला दर्शवू शकायचे. ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’मध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान हे कधीच पूर्णतः नष्ट झाले नाही.

मागील भाग : संगणकाची गोष्ट – प्रस्तावना

पुढील भाग : पुनरूत्थान, समकालीन महाराष्ट्र, पास्कलाईन – यांत्रिक गणकयंत्र