‘गरज ही शोधाची जननी असते’, असे म्हणतात. १९व्या शतकात उद्योगिकीकरणाचा वेग वाढीस लागला. उद्योगधंदे व व्यवसायांत भरभराट होऊ लागली. त्यामुळे अधिक वेगवान व अचूक आकडेमोड करण्याची गरज निर्माण झाली. या गरजेतूनच पुढे आधुनिक संगणकाचा जन्म झाला. विद्युत प्रवाहाचा शोध लागण्यापूर्वी सुरु झालेला संगणकाचा प्रवास आजही थांबलेला नाही. उलट तो अधिक गतीमान झाला आहे.

आधुनिक संगणकाचा इतिहास हा चार्ल्स बॅबेज यांच्यापासून सुरु होतो. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १७९१ रोजी इंग्लंडमधील ‘लंडन’ या शहरात झाला.  चार्ल्स यांच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. लहानपणी त्यांची प्रकृती ठीक नसायची. त्यामुळे त्यांचे बुहूतेक शिक्षण हे घरच्याघरी पार पडले. त्यांना गणितात रस होता. चार्ल्स यांनी आपले उच्च शिक्षण १८१४ साली केंब्रिज विद्यापिठातून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करताच ते लग्नाच्या बेडीत अडकले. पण त्यांच्या वडिलांना मात्र त्यांचे हे लग्न फारसे पसंत नव्हते.

चार्ल्स बॅबेज
चार्ल्स बॅबेज

चार्ल्स बॅबेज यांनी काही काळ ‘रॉयल इन्स्टिट्युट’मध्ये खगोलशास्त्र शिकवण्याचे काम केले. परंतु दरम्यानचा बराच काळ ते आपल्या वडिलांवर अवलंबून होते. दूर्देवाने पुढे बॅबेज यांचे वडिल, पत्नी व एक मुलगा हे तीघेही १८२७ साली वेगवेगळ्या कारणाने मरण पावले. तो त्यांच्यासाठी मोठा आघात होता. त्यातून स्वतःला सावरत त्यांनी १८२८ ते १८३९ दरम्यान केंब्रिज विद्यापिठात मानाचे अध्यापकपद सांभाळले. त्याकाळात युरोपीय साम्राज्यवाद जोर धरत होता. सन १८१८ साली मराठी लोकांचे भारतातील ‘मराठा साम्राज्य’ संपुष्टात आले आणि इंग्रजांनी भारताची सुत्रे मराठ्यांच्या हातून आपल्या हाती घेतली.

चार्ल्स बॅबेज हे काळाच्या पुढचे व्यक्तीमत्त्व होते. इतर अनेक प्रतिभासंपन्न व्यक्तिंप्रमाणे त्यांचा स्वभावही इतरांच्या दृष्टीने काहीसा विक्षिप्त होता. तरुणपणी पाण्यावर चालण्याचा प्रयोग करत असता ते बुडता बुडता वाचले. अचूकतेसाठी ते अत्यंत आग्रही असायचे. त्यांच्याहून वेगळे मत त्यांना फारसे रुचायचे नाही. ‘जिथे एक माणूस मरतो, तिथे एक माणूस जन्म घेतो’, अशा आशयाची एक ओळ एका तत्कालीन कवीने आपल्या कवितेत लिहिली होती. बॅबेज यांनी त्या कवीला पत्र पाठवून ती ओळ चुकीची असल्याचे नमूद केले. ‘जर एक माणूस मेल्यानंतर एक माणूस जन्माला आला असता, तर जगाची लोकसंख्या स्थिर असली असती! तेंव्हा ‘जिथे एक माणूस मरतो, तिथे १.०६२५ माणूस जन्माला येतो’, अशी ती ओळ असायला हवी’, असे बॅबेज यांचे म्हणने होते. लंडनमधील रस्त्यावर संगीत वाजवणार्‍या लोकांचा कामात व्यत्यय होतो, म्हणून त्यांनी त्यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता. याकारणाने हे लोकही त्यांच्यावर बरेच नाराज होते.

मागील भाग : पुनरूत्थान, समकालीन महाराष्ट्र, पास्कलाईन – यांत्रिक गणकयंत्र

पुढील भाग : डिफरन्स इंजिन – चार्ल्स बॅबेज